सिल्लोड, (प्रतिनिधी) : दीपावली सणानिमित्त सिल्लोड शहरात नगर परिषदेने शहर वासियांसाठी मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छता , सुरळीत वीज पुरवठा या सारख्या सुविधेवर भर देवून दीपावली, पाडवा व भाऊबीज सणाच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी नगर परिषद प्रशासनास दिल्या आहेत.
दीपावली सणाच्या अनुषंगाने आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी नगर परिषदेच्या उपाययोजनेचा आढावा घेतला. दीपावली निमित्त शहरात खरेदी साठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. सर्वत्र होणारी फटाक्यांची आतषबाजी पाहता अग्निशमन दलाचे बंब सतर्क ठेवावे, स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम हाती घ्यावेत, सणासुदीला मुबलक पाणी पुरवठा व शहरात प्रखर विद्युत रोषणाई व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी नगर परिषदेला दिल्या आहेत.
संपूर्ण सिल्लोड शहर सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आहेत. तरी देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील योग्य ती खबरदारी घ्यावी असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. एकूणच दीपावली सण सुरक्षित आणि आनंदात साजरा होण्यासाठी नागरिकांनी देखील नियमांचे पालन करत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
















